केंद्र सरकारने ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या भारतात तीन हजार हेक्टरवर या ड्रॅगन फ्रूटची लागवड आहे. येत्या पाच वर्षांत ही लागवड 50 हजार हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
ड्रॅगन फ्रूट एक वनौषधी फळ म्हणूनही ओळखले जाते. आरोग्याच्या दृष्टीने हे फळ चांगले आहे. ड्रॅगन फ्रूटची दक्षिण मेक्सिको, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. तसेच दक्षिण-पूर्व आशिया, यूएसए, कॅरिबियन बेटे, ऑस्ट्रेलियामध्येही संपूर्ण उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय भागात याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. ही वनस्पती मूळची दक्षिण मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील आहे. आज जगभरात याची लागवड केली जाते. त्यानंतर आशियाई देशांमध्येही ड्रॅगन फ्रूटचा विस्तार झाला. गुजरात राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूट या फळाचं नाव बदलले आहे. या फळाचा बाह्य आकार हा कमळाच्या फुलाप्रमाणे असल्यामुळे याचं नाव ‘कमलम’ केलं आहे. ड्रॅगन फ्रूट ही वनस्पती 20 वर्षांपेक्षा जास्त काळ उत्पादन टिकवून ठेवते. पौष्टिक गुणधर्म जास्त असतात. तसेच मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगांसाठी हे फळ चांगले आहे. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.