महाशिवरात्री विशेष:
महाशिवरात्री म्हणजे “शिवाची महान रात्र” हा भारतीय आध्यात्मिक कॅलेंडरमधील एक महत्वाचा सोहळा आहे. माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात.उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.
:
महाशिवरात्री का साजरी केली जाते?
असे मानले जाते की,काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात.
एका कथेनुसर समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि म्हणूनच हा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. असे म्हणतात की महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.
शिवलिंगावर दुधाने अभिषेक घालतात याचे महत्व जाणून घेऊया:
शंकर देव हे त्रिमूर्तींपैकी एक आहेत. शंकराची पूजा ही शिवलिंग आणि मूर्तीच्या रुपात केली जाते. महाशिवरात्रीला शिवलिंगावर गायीच्या दुधाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. असं केल्याने संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. ती व्यक्ती रोगमुक्त राहते,असे मानले जाते.तसेच शिवलिंगावर ओतलेले पाणी पवित्र तीर्थ मानले जाते. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात.