संस्थेत वाद असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांची वेतननिश्चिती, वेतनवाढ, वरिष्ठ वेतनश्रेणी / निवडश्रेणी व इतर प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना प्रदान करणेबाबत vetananischiti vetanvadh varishtha vetanshreni nivad shreni
संदर्भ:-१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-१९१०/ (३४९/१०)/प्राशि-३, दिनांक ०९.०८.२०१०
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुध्दीपत्रक क्र: वेतन-१२१८/प्र.क्र.८६/१८/टीएनटी-३, दिनांक २५.०४.२०१८
प्रस्तावना:-
संस्थेमध्ये वाद असल्यास व मुख्याध्यापकांची वेतननिश्चिती संस्थेमार्फत होणे शक्य नसल्यास अशा शाळांमधील मुख्याध्यापकांची वेतननिश्चिती, वेतनवाढी, सेवानिवृत्तीवेतनाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिनांक ०६.०३.२०१० च्या शासन पत्रान्वये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना देण्यात आले आहे. तसेच प्राथमिक स्तरावर सुध्दा शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये वाद असल्यास शासन परिपत्रक दिनांक ०९.०८.२०१० अन्वये सदर बाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना देण्यात आले आहेत. परंतु सदर परिपत्रकामध्ये काही मुद्यांचा समावेश करणेबाबत काही लोकप्रतिनिधींनी शासनास निवेदन सादर केले आहे. तसेच लोकप्रतिनिधींमार्फत याबाबत विधानमंडळामध्ये विविध आयुधे उपस्थित केली आहेत. त्यानुषंगाने सदर शासन परिपत्रकामध्ये सुधारणा करणेची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन शुध्दीपत्रक:-
शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-१९१०/ (३४९/१०)/प्राशि-३, दिनांक ०९.०८.२०१० मधील परिच्छेद क्र.२ मध्ये पुढे नमूद करण्यात आलेल्या वाक्यामध्ये “प्राथमिक स्तरावर सुध्दा शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये वाद असल्यास, खालील अटींच्या अधिन राहून मुख्याध्यापकाची वेतननिश्चिती/वेतनश्रेणी/निवृत्तीवेतनविषयक प्रकरणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे स्तरावरून सादर करण्याचे अधिकार या आदेशान्वये प्रदान करण्यात येत आहेत” दुरूस्ती करण्यात येत असून याऐवजी पुढीलप्रमाणे वाचावे-
“प्राथमिक स्तरावर सुध्दा शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये वाद असल्यास, खालील अटींच्या अधीन राहून मुख्याध्यापकांची वेतननिश्चिती, वेतनवाढ, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी, भविष्य निर्वाह निधीविषयक प्रकरणे तसेच निवृत्तीवेतनासंदर्भातील प्रकरणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे स्तरावरून निर्णय घेण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.”
सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०२२७१७४३३८३०२१ असा आहे. हे शासन शुध्दीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,