जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन – २०२५ teacher online transfer portal
महोदय/महोदया,
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतचे धोरण दि.१८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सुधारीत करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील व्याख्या १.८ येथे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ करिता पात्र गणले जाणारे शिक्षक नमूद केले आहेत. त्यानुसार १.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांना तसेच १.८.१५ जोडीदाराची हृदय शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा शिक्षकांना विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जाते. या संवर्गातील शिक्षकांना बदलीस नकार देण्याचा अधिकार असून या शिक्षकांना केवळ विनंतीवरूनच बदली देण्यात येते.
२. शासन निर्णयातील उपरोक्त तरतुदीनुसार शासनास केवळ गंभीर आजाराने ग्रस्त शिक्षक व जोडीदार गंभीर आजाराने ग्रस्त असेल तरच अशा शिक्षकांना बदलीतून सूट देणे अभिप्रेत आहे. त्यामुळे हृदय शस्त्रक्रिया म्हणजे केवळ Bypass surgery, Open heart surgery किंवा Implant surgery इ. अशा गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांनाच बदलीतून सूट किंवा विनंती बदली देणे आवश्यक आहे. Angioplasty झालेल्या शिक्षकांना विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ चा लाभ अनुज्ञेय नाही. तथापि, काही जिल्हा परिषदांकडून Angioplasty झालेल्या शिक्षकांना विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ चा लाभ अनुज्ञेय करण्यात आल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
३. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेकरिता सर्व जिल्हा परिषदांनी समान कार्यपद्धती वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सूचित करण्यात येते की, दि.१८.०६.२०२४ व दि.२३.०५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार यापुढील जिल्हांतर्गत/आंतरजिल्हा बदलीकरिता केवळ हृदय शस्त्रक्रिया म्हणजे Bypass surgery, Open heart surgery, Implant surgery इ. गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांना तसेच जोडीदाराची हृदय शस्त्रक्रिया म्हणजे Bypass surgery, Open heart surgery, Implant surgery इ. शस्रक्रिया झाली असेल तरच विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून लाभ अनुज्ञेय करण्यात यावा. Angioplasty झालेल्या शिक्षकांना विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून लाभ अनुज्ञेय करण्यात येवू नये. शासनाच्या सदर सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची राहील.