प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत pm poshan mid day meal swyanpaki madatnis
:-शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१०/प्र.क्र.१८/प्राशि-४, दि.०२ फेब्रुवारी, २०११.
प्रस्तावना:-
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी राज्यातील विविध शाळांमध्ये मानधन तत्वावर स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत. सदर स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना केंद्र व राज्य हिस्सा मिळून प्रति माह रु.२५००/- इतके मानधन देण्यात येते. प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ मधील परिच्छेद ९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पाडावे लागते. प्रस्तुत कामकाजामध्ये शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे ही बाब नमूद आहे. सदर काम योजनेशी संबंधित कामकाजव्यतिरिक्त असल्याने प्रस्तुत कामाबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस कामगार संघटना यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनेकडून शासनास वेळोवेळी निवेदन प्राप्त होत असून योजनेव्यतिरिक्त अन्य कामे न देण्याची तसेच स्वयंपाकी तथा मदतनीस यांना कामावरुन विनाकारण विनाचौकशी कमी न करण्याची मागणी केली जात आहे. त्यानुषंगाने प्रस्तुत योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाज सुनिश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी पुढीलप्रमाणे कामकाज पार पाडावे.
1. शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विहीत वेळेत पोषण आहार शिजविण्याचे काम करणे.
ii. तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे.
iii. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर आहाराचे वाटप करणे.
iv. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर जेवणाच्या जागेसह स्वयंपाकगृहाची साफसफाई करणे तसेच सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे.
V. पोषण आहाराकरीता वापरण्यात आलेल्या भांड्याची तसेच विद्यार्थ्यांच्या ताटांची साफसफाई /स्वच्छता करणे.
vi. पोषण आहाराकरीता आवश्यक असणारे पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरविणे.
vii. शाळास्तरावर परसबाग निर्मिती व देखभालीकरीता सहकार्य करणे.
viii. अन्न शिजविताना वापरलेल्या भाजीपाला विषयक नोंदी ठेवणे.
२. प्रस्तुत योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी. तदनंतर याबाबत संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील उचित कार्यवाही करण्यात यावी.
प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२१८१६५१२९०९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.