विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७मधील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेद्वारे पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा दिनांक निश्चित करण्याबाबत vibhagiy spardha pariksha karmachari promotion sevajeshthata
प्रस्तावना-
सामान्य प्रशासन विभागाच्या उक्त दि.७ मे २०२१ च्या शासन निर्णयान्वये पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय स्थानापन्न पदोन्नतीसाठी म्हणजेच सेवाज्येष्ठता-नि-योग्यता या पद्धतीने देण्यात येणाऱ्या पदोन्नतीसाठी लागू होतो. सदर शासन निर्णय निर्गमित करताना मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे देण्यात येणाऱ्या वेगवर्धित पदोन्नत्यांद्वारे नियुक्ती मिळालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढील पदोन्नती देण्यासाठी सेवाज्येष्ठतेचा कोणता दिनांक विचारात घेण्यात यावा याचा विचार झाला नव्हता. मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे झालेल्या पदोन्नत्या या मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असून त्या गुणवत्ता यादीतील क्रमानुसार त्या पदाची सेवाजेष्ठता ठरत असते, म्हणून मूळ संवर्गात सेवेत कनिष्ठ उमेदवाराला अधिक गुण असल्यास त्याला सेवाज्येष्ठता यादीत वरचे स्थान मिळते. विविध न्यायनिर्णयांमध्ये सेवा जेष्ठतेबाबत गुणवत्तेचे हे तत्व मान्य झालेले आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय विभागांमधील मर्यादित विभागीय परिक्षेद्वारे वरिष्ठ पदावर पदोन्नत झालेल्या उमेदवारांची वरिष्ठ पदावरील सेवाजेष्ठता परीक्षेतील गुणांच्या आधारावर जी निश्चित होईल तीच कायम ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासाठी खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
शासन निर्णय-
सर्व प्रशासकीय विभागांमधील मर्यादित विभागीय परिक्षेद्वारे वरिष्ठ पदावर पदोन्नत झालेल्या उमेदवारांची वरिष्ठ पदावरील सेवाजेष्ठता खालीलप्रमाणे निश्चित करण्यात यावी.
अ) दि. २५.०५.२००४ रोजी किंवा त्यापूर्वी शासन सेवेत रुजू झालेले जे कर्मचारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे वरिष्ठ पदावर पदोन्नत झाले असतील ते त्यांच्या दि. २५.०५.२००४ रोजीच्या वरिष्ठ पदाच्या सेवाज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील व
ब) दि. २५.०५.२००४ नंतर जे कर्मचारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे वरिष्ठ पदावर पदोन्नत झाले असतील ते त्यांच्या वरिष्ठ पदावरील नियुक्तीच्या दिनांकापासून सेवाज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील.
२. उक्त पदोन्नत्या निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात मा. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ वरील अंतिम निर्णयाच्या अधिन असतील. अशी कार्यवाही करतांना पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ घेऊन सध्याच्या सेवाज्येष्ठता यादीत वरच्या स्थानावर आलेल्या कोणत्याही मागासवर्गीय अधिकारी/कर्मचा-यांना पदावनत करण्यात येऊ नये.
३. सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०७२९१७५६३५७००७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,