एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस आंदोलन केले. या काळात प्रवासी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी तत्वावर एसटी चालकांची भरती केली होती. नंतर एप्रिल-2022 मध्ये आंदोलन मागे घेतल्यावर एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले, तरी कंत्राटी कामगारांना काढले नव्हते.
आता एसटी कर्मचारी कामावर परतल्याने कंत्राटी चालकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने तब्बल 800 कंत्राटी चालकांची सेवा शनिवारपासून (ता. 3) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश एसटी वाहतूक महाव्यवस्थापकांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले आहेत.
हेही वाचा : जाणून घ्या कस मिळणार दोन दिवसात पॅन कार्ड :https://updatesa2z.com/2022/08/pancard-update.html
राज्यात तब्बल 2176 कंत्राटी चालकांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संबंधित कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांची पूर्तता केली नाही. त्यामुळे संबंधित कंत्राट रद्द करून, कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काळात एसटी प्रशासनाकडून नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. राज्यभरासाठी एकच कंत्राटदार नेमला जाणार असून, सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त नवीन कंत्राटी चालकांची भरती केली जाणार आहे.
कोरोनामुळे मागील 2 वर्षात एसटीची सेवा पूर्णतः बंद होती. त्यावेळी मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे आदेश ‘मविआ’ सरकारने एसटी महामंडळाला दिले होते. याच काळात खासगी संस्थांना कंत्राटी चालक नियुक्तीचे आदेश एसटी महामंडळाने दिले होते. त्यामुळे पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती वाढवण्यात आली होती..
वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचीच भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विभागवार विविध कंत्राटदारांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. विविध विभागांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली.