प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत अन्न व विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी पालन करावयाच्या मानक कार्यपध्दती SOP-Standard Operating Procedure
:-प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि.२१ डिसेंबर, २०२२.
प्रस्तावना:-
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेमधील इ.१ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योजनेंतर्गत इ.१ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ.६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिने युक्त दुपारचे भोजन देण्यात येते.
ग्रामीण भागात तांदुळाची वाहतूक व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रियेव्दारे जिल्हानिहाय पुरवठेदार नियुक्त करण्यात येतात. सदर पुरवठेदारामार्फत शाळास्तरावर तांदुळ व इतर धान्यादी मालाचा पुरवठा करण्यात येतो. संबंधित शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नियुक्त स्थानिक महिला / स्वयंपाकी तथा मदतनीस / बचतगट यांच्यामार्फत अन्न शिजवून पोषण आहाराचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येते. तसेच, नागरी भागातील ज्या शाळांमध्ये धान्य साठविण्यासाठी तसेच स्वयंपाकगृहासाठी जागा उपलब्ध नाही अशा शाळांमध्ये संबंधित शाळांच्या शालेय व्यवस्थापन समितीमार्फत महिला बचत गटांची नियुक्ती करुन योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.
सदर योजनेंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनातून विषबाधेच्या घटना राज्यामध्ये घडत असल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यानुषंगाने सदर योजनेंर्गत अन्न विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी
पालन करावयाच्या मानक कार्यपध्दती (SOP-Standard Operating Procedure) निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक :-
१) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यामध्ये राबविण्यात येते. सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना सकस, पौष्टिक, रुचकर तसेच, चांगल्या दर्जाचा पोषण आहाराचा लाभ मिळणे आवश्यक आहे. सबब, सदर योजनेंतर्गत अन्न विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी पालन करावयाच्या मानक कार्यपध्दती (SOP-Standard Operating Procedure) सोबत जोडलेल्या परिशिष्ट प्रमाणे राहतील.
२) उपरोक्तप्रमाणे मानक कार्यपध्दतींचे सर्व संबंधितामार्फत काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच, सदर योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय /परिपत्रक / मार्गदर्शक सूचना / निर्देश यांचे सुध्दा तंतोतंत पालन करण्यात यावे.
३) प्रस्तुत शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०८०११६१२१३६४२१ असा आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.